तालुक्यातल मान्सून स्थिरावला असून गुरूवारी (ता. २०) दुपारपासून पावसाने राजापूरकरांना झोडपून काढले. त्यामध्ये अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, महामार्गावरील हातिवले येथील टोलनाक्याचा पुढील भाग, कोंड्ये, उन्हाळे या परिसरामध्ये रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. चिखलमिश्रित गढूळ पाण्यातून त्यांना रस्ता शोधावा लागत आहे. एसटी डेपोसमोरून शहरामध्ये जाणाऱ्या रस्त्याला जकातनाक्यापर्यंत गटारच नसल्याने रस्त्याशेजारील दुकानांमध्ये पाणी जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने वादात सापडले आहे. आता रस्त्यावरून वाहणाऱ्या मोठया प्रमाणातील पावसाच्या पाण्यामुळे महामार्ग चर्चेत आला आहे.
हातिवले येथील टोलनाक्याच्या पुढील भागामध्ये रस्त्याच्या सखल भागामध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. सुमारे एक ते दीड फूट उंच साचणाऱ्या या पाण्यामध्ये रस्त्याचा त्या परिसरातील बहुतांश भाग पाण्याखाली जातो. रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत आणि पाण्याचा अंदाज घेत वाहने चालवताना कसरत करावी लागते. उन्हाळे, कोंड्ये या परिसरातही मोठ्या प्रमाणात चिखलमिश्रित पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे नेमका रस्ता कुठे आहे याचा अंदाजाने शोध घेत वाहने चालवावी लागत आहेत. डेपोसमोरून शहरामध्ये जाणाऱ्या रस्त्याला जकातनाक्यापर्यंत गटारच शिल्लक राहिलेले नाही.