जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच एमआरआयची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना होणारा अतिरिक्त खर्च आवाक्यात येईल. महिन्याभरात ही सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार डॉ. भास्कर जगताप यांनी नुकताच स्वीकारला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या जागी डॉ. भास्कर जगताप यांची जिल्हा शल्यचिकित्सक पदावर निवड झाली आहे.
त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा घेतला. यात त्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांची मंजूर पदे, सद्यःस्थितीतील भरलेली पदे, हजर पदे आणि रिक्त पदे याबाबत चर्चा केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांबरोबर इतर कर्मचारीवर्गही कमी आहे. ७० परिचारिकांची पदेही रिक्त आहेत.
पुढील महिन्यापर्यंत परिचारिकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. जिल्हा रुग्णालयात एमआरआयची सुविधाही उपलब्ध होणार आहे. २७ फेब्रुवारीला एक समिती येऊन निरीक्षण करणार आहे. त्यानंतर एमआरआयची सेवाही सुरू होईल. एमआरआय आणि सीटीस्कॅनची यंत्रणा हाताळण्याची जबाबदारी दुसऱ्या एजन्सीला देण्यात येईल, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.