जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अनेकदा बँक आणि पोलिसांकडून सूचना देऊन सुद्धा अनेक लोक अशा गोष्टीमध्ये अडकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणाच्या नावाने देखील अशा प्रकारचे फेक मेसेज व्हायरल होत असल्याची माहिती कळविण्यात आली होती. सोशल साईट्सचा आधार घेत असे चोरटे मेसेज करून ग्राहकांची दिशाभूल करत आहेत.
विज बिल अपडेट केले नाही त्यामुळे वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल असा व्हाॅट्सअप मेसेज आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या लिंक वर अकाउंटची माहिती दिल्याने कडवई येथील डॉक्टरांची २४ हजार ७९९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात मयुरेश विलास पुरोहित यांनी माहिती दिली असून त्याने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर विज बिल अपडेट न केल्याने वीज कनेक्शन खंडित करण्यात येईल असा व्हाट्सअप वर मेसेज आला. हा मेसेज तिने पती मयुरेश यांना फॉरवर्ड केल्यानंतर त्यांनी या नंबर वर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने
तुमचे वीज बिल अपडेट करण्याकरता मी तुम्हाला लिंक पाठवत आहे असे सांगत दहा हजार रुपये भरण्यास सांगितले म्हणून सदरची लिंक उपयोग करत मयुरेशने दहा हजार भरले. त्यानंतर खात्यामधून दहा हजार, ९९९९ व नंतर ४८०० रुपये डेबिट झाल्याचे तीन मेसेज आले आहेत आणि अकाउंट मधून २४ हजार ७९९ डेबिट झाल्याचा मेसेज आल्यावर काहीतरी फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या ध्यानात आले.