महामार्गावर रोज लहान मोठा एक तरी अपघात घडत आहे. त्यामुळे वाहनांच्या नुकसानासकट जीवितहानी देखील घडत आहे. वाहतूक पोलीस यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. तसेच महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या चालकांना देखील विलंबाचा सामना करावा लागत आहे.
मुंबई- गोवा महामार्गावर आंजणारी पूल येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात होऊन एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली होती. ही घटना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मुंबई ते गोवा या दिशेने जाणारा एम एच ४८, ए वाय- ९३१४ ही महिंद्रा पिकअप आंजणारी पुलाजवळ रस्त्याच्या बाजुला उभी होती. याचवेळी मागून येणाऱ्या एम एच ४५, बीयू- ५६३ या मालवाहू ट्रेलरने महिंद्रा पिकअपला मागाहून जोरदार धडक दिली. यावेळी ट्रेलरच्या मागून वेगात येणार्या आयशर टेम्पोने पुन्हा महेंद्र पिकअपला मागुन जोरदार धडक दिली. पीकअपला दोन वाहनांनी धडक दिली असतानाच गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फोर्ट कारला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका १६ चाकी ट्रकने जबर धडक दिली. वाहन चालकाना अंदाज न आल्याने एकाच ठिकाणी हा विचित्र अपघात घडला. या घडलेल्या अपघातामध्ये पाचही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
आंजणारी पूल येथे घडलेल्या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. लांजा पोलीस तसेच हातखंबा येथील वाहतूक पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली व त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.