कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तोक्ते वादळाबाबत नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणच्या दौऱ्यावर रविवारी आलेले. तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड किनारपट्टी भागापासून नाना पटोले यांनी भेट दयायला सुरुवात केली. तेथील झालेले नुकसान, पडझड यांचा आढावा घेऊन, तेथील स्थानिक जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि झालेल्या नुकसानाबद्दल लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्याचे ग्वाही दिली आहे.
रायगड किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर नाना पटोलेनी रत्नागिरीकडे जाण्यास निघाले, मधी महाड येथे थांबून त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली, त्यामध्ये ते म्हणाले कि, तोक्ते वादळामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण म्हणजे फळ बागा, मत्स्य व्यवसाय, स्वच्छ किनारपट्टी, पर्यटन उद्योग असेच समीकरण, परंतु, या वादळामुळे सगळीकडे, झाडे, घरे, विद्युत खांबे सगळ्याचीच पडझड झाल्या कारणाने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, आणि कोकणवासियांना सर्वतोपरी मदत करून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असली तरी राज्याने वेळ आली तर कर्ज काढून वेळेत मदत पुरवली पाहिजे, असे जळजळीत शाब्दिक टीकास्त्र त्यांनी सोडले.
कोकणामध्ये मत्स्य व्यवसाय अग्रेसर आहे. मिरकरवाडा बंदरावर जाऊन प्रत्यक्ष मत्स्य व्यवसायामध्ये असणार्या जनतेची भेट घेतली. पाहणीमध्ये जहाजांचे वादळी वार्यामुळे झालेले नुकसान त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. तेथील स्थानिक मच्छी व्यावसायिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. प्रत्यक्ष येऊन नौकांची पाहणी केल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण पसरले. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचा बहुतांश परिणाम मत्स्य व्यवसायावर झालेला दिसत आहे. मच्छीमार्यानी मासेमारी बंद असल्याने नौकांची दुरुस्ती करणे, जाळ्याची देखभाल करणे, कुटुंबाची जबाबदारी, बँकेचे हफ्ते सर्व समस्यांवर तोडगा फक्त शासनाने सढळ हस्ते मदत केली तरचं होऊ शकते असे सांगितले. या मागण्या लक्षात घेऊन पटोले यांनीही सरकारची मदत सर्वतोपरी लवकर पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याचे आश्वासन दिले.