संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसरामध्ये रविवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. दिवसेंदिवस होणारा वातावरणातील बदल (ग्लोबल वार्मिंग) मुळे काही ठिकाणी पावसाळी वातावरण तर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात उष्मा जाणवत आहे. तोक्ते वादळानंतर सगळीकडे काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यामध्ये आलेल्या तोक्ते वादळामुळे देवरुखसह आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्याचे दिसले तर रविवारी सकाळी साधारण ९ वा. १०मि.नी याच परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. भूकंपाच्या धक्क्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता जरी रेक्टर स्केलमध्ये मोजता आली नसली तरी बसलेल्या सौम्य धक्क्याने कुठेही पडझड किंवा कोणतेही नुकसान झालेले नाही.
विशेष म्हणजे भूकंपाचा धक्का एवढा सौम्य होता कि, काही जणांना तो जाणवलाही नाही. मात्र बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असणार्या लोकांना या भूकंपाचा धक्का जाणवला. काही ठिकाणी स्वयंपाक घरातील मांडणी मध्ये असलेली भांडी खाली पडल्याने, भांड्यांच्या खणखण येणाऱ्या आवाजामुळे लोकांना जाग आली, तर रविवार असल्याने आणि सध्या लॉकडाऊन असल्याने दैनंदिन जीवनशैली शिथिल झाल्याने गाढ झोपेमध्ये असणार्यांना बेडची हालचाल जाणवल्यामुळे भूकंप झाल्याचे लक्षात आले. बिल्डींग मधील नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवताच जीव वाचविण्यासाठी बिल्डींगखाली धाव घेतली.
देवरुखसह याच वेळी पाटण, साताऱ्यामध्येही भूकंपाचा धक्का जाणवला आहे. त्या भूकंपाची तीव्रता ३.३ रेक्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली आहे. साधारण कोयनेच्या वीस किलोमीटर परिसरामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोयना धरणाला कोणताही धोका निर्माण झाला नसल्याचे तेथील व्यवस्थापन अधिकार्यांनी माहिती दिली आहे. परंतु, अचानक बसलेल्या धक्क्याने सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.