नाटळ कणकवली येथील जंगलमय भागात बिबट्याची बंदुकीने शिकार करून त्याचे कातडे तस्करी केल्या प्रकरणी अजून शोध घेतला असता, संशयितांकडून बंदूक, बिबट्याची १४ नखे, दात व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा खोलवर तपास पोलिस यंत्रणा करत असून आतापर्यंत चौघांना अटक केली असून अजून दोघांच्या मागावर पोलिस आहेत.
घडलेल्या घटनेची माहिती अशी कि, स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तळेरे येथे छापा टाकून बिबट्याचे कातडे तस्करी प्रकरणी दोघांना अटक केली होती. सध्या पोलिसांच्या ताब्यात चौघे संशयित आहेत. त्यांना ता. ११ ऑगस्ट येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. मंगेश सावंत, आप्पा सावंत, श्रीराम सावंत आणि संतोष मेस्त्री, अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आप्पा हरिश्चंद्र सावंत याच्याकडून एक बंदूक, बिबट्याची १४ नखे, दोन दात, एक बॅटरी जप्त करण्यात आली. तसेच संशयित मंगेश सावंतकडून दोन चाकू, कोयता, फावडे, कुदळ आणि बॅटरी जप्त केली. संशयित आप्पाने दोन वर्षांपूर्वी बिबट्याची शिकार केल्याचे निष्पन्न झाले. या बिबट्याचे कातडे श्रीराम सावंत आणि संतोष मेस्त्री यांच्या माध्यमातून मुख्य संशयित राजेंद्र पारकर याच्यापर्यंत पोहोचले होते. श्रीरामला बिबट्याची कातडी कोणी दिली ! याचे उत्तर आप्पा सावंत यांनी दिल्याचे कळले. तसेच ज्या परिसरात शिकार झाली होती. त्या परिसराचाही पंचनामा पोलिसांनी केला. ज्या परिसारत बिबट्याचे उर्वरित अवशेष गाडले होते, तेथेही पोलिसांनी पंचनामा केला.
या प्रकरणात अन्य संशयितांचाही समावेश असून इतर सहभागीनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी दिली आहे. उपनिरीक्षक वृषाली बरगे, पांडुरंग पांढरे, चंद्रकांत झोरे अधिक तपास करीत आहेत.