रत्नागिरीमध्ये रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम आणि सध्या सुरु असलेला मुसळधार पाऊस यामुळे अद्यापही अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. जयगड-निवळी रस्त्यावरील उंडी फाटा येथे स्कूलबस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ४ वा. सुमारास झाला. या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याकडून करण्यात आला आहे.
स्वप्नील सुरेश गुरव वय ३६, रा.मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर स्कूलबस चालक सागर सुभाष खाडे रा. जयगड, रत्नागिरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील जिंदाल कंपनीमध्ये कामाला होता. बुधवारी सायंकाळी तो कंपनीतून घरी जात होता. त्याच सुमारास सागर खाडे आपल्या ताब्यातील स्कुलबस घेऊन समोरून येत होता. ही दोन्ही वाहने उंडी फाट्यावर आली असता बसची धडक स्वप्नीलच्या दुचाकीला बसून हा अपघात झाला. यात स्वप्नीलला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.
स्वप्नीलच्या आकस्मित अपघाती निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली असून, स्वप्नीलच्या पश्चात त्याची पत्नी, दोन मुली, आई, बहिण असा मोठा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशीतील नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने खंडाळा येथील आरोग्य केंद्रात दाखल झालेत. खंडाळा आरोग्य केंद्रात त्याचा मृतदेह नेण्यात आला असून, शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात येणार आहे. तरुणाचे अशा प्रकारे निधन झाल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.