जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष नवजात शिशू काळजी कक्षामध्ये दाखल झालेल्या कमी वजनाच्या बालकावर लिसा या अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे ते बाळ सुरक्षित असून, त्याला नुकतेच आईसह घरी सोडण्यात आले आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष नवजात शिशू काळजी कक्षात महेक जांभारकर (पडवे, गुहागर) यांच्या बाळाला दाखल करण्यात आले होते. त्या बालकाचा जन्म खासगी रुग्णालयात झाला होता. बालक जन्मतः खूपच कमी वजनाचे (१ हजार ३६५ ग्रॅम) व कमी दिवसाचे (३२ आठवडे) होते.
बाळाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबरीश आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयू विभागात कार्यरत बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय सूर्यगंध, डॉ. शायान पावसकर व डॉ. आदित्य वडगावकर तसेच अधिसेविका जयश्री शिरधनकर, बालरोगतज्ज्ञ परिचारिका श्रुती जाधव व कक्ष परिसेविका सुवर्णा कदम, तसेच कार्यरत अधिपरिचारिका यांच्या अथक परिश्रमाने बालकात सुधारणा होत गेली.
रत्नागिरीमध्ये लिसा पद्धतीचे उपचार कमीवेळा केले जातात. संबंधित मातेला रुग्णालयामधून मोफत आहार पुरवण्यात येत होता. बाळाच्या डोळ्याची तपासणी आणि उपचार खासगी रुग्णालयामधून मोफत करून घेण्यात आले. ४२ दिवसांनतर डॉक्टरांच्या सल्ल्याने अर्भकाला घरी सोडण्यात आले.
बाळाचे डोळे सुरक्षित – कमी वजनाचे बाळ असेल तर अनेक वेळा डोळ्यांना रेटिनाचा त्रास जाणवतो. कदाचित त्या बाळाला दिसू शकत नाही. त्यासाठी दोन इंजेक्शन दिली जातात, तसेच फुप्फुसात हवा जाण्यासाठीही योग्य ते उपचार करण्यात आले होते. त्यामुळे ते बाळ सुरक्षित असून, त्याला घरी सोडण्यात आले आहे. पुढेही उपचार सुरू राहणार आहेत. अशा पद्धतीचा उपचार कमी वेळा अवलंबावा लागतो, असे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी सांगितले.