गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीचे अनेक किस्से आता उघड होत आहेत. मास्टरमाईंड अनी जाधव हा कन्सल्टन्ट फी (सल्ल्यासाठी) म्हणून दोन लाख रुपये घेत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर अनीने नेतृत्वगुणाची (लीडरशिप) पुस्तक वाचून संचालक मंडळींना चुना लावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ३३६ तक्रारी दाखल झाल्या असून, चार कोटी १८ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतील या तक्रारी आहेत.
आरजू कंपनीने स्वयंरोजगार निर्माण करून त्यासाठी लागणारा कच्चा माल देऊन तयार पक्क्या मालाला बाजारपेठ निर्माण करून देण्याचे आमिष दिले तसेच परताव्याची रक्कमही दिली नाही. त्यामुळे कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी संजय केळकर, प्रसाद फडके या दोन संचालकांना अटक केली. त्यांच्याकडून याबाबत बरीच माहिती पोलिसांना मिळाली. या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड अनी जाधव असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. गुन्ह्यात त्याचे नाव असले तरी कंपनीच्या कागदोपत्री तो कुठेच नाही. त्यामुळे पोलिस त्याच्या शोधात आहेत. जाधव मोबाईलचे जे सीमकार्ड वापरत आहे ते अन्य व्यक्तीच्या नावे आहेत. त्यामुळे त्याचा शोध लागणे कठीण झाले आहे.
या सर्व चौकशीमध्ये अनी जाधव एवढा हुशार निघाला की, कंपनीच्या कोणत्याही रेकॉर्डवर नसताना तो सल्लागार म्हणून केळकर आणि फडके यांच्याकडून लाखांची फी घेत होता. एवढेच नव्हे तर मंडळ नामक एका व्यक्तीने याच गुंतवणुकीच्या नावाखाली या कंपनीच्या संचालकांना आदी ११ लाखांचा गंडा घातला होता. तो खड्डा भरून काढण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने केला आणि ते गोत्यात आले. विशेष म्हणजे मंडळ आणि अनी जाधव यांनी आरजूच्या संचालक मंडळाला चुना लावल्यामुळे या दोघांकडे कोणतीही अतिरिक्त मालमत्ता नसल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे.