मोठ्या शहरांमध्ये नवजात बाळांचे अपहरण करणे, जन्मताच मुल दत्तक देणे या घटनांबद्द्ल आपण अनेकदा ऐकतो. रत्नागिरी शहरामध्ये नवीन जन्मलेल्या बालकाला दत्तक देण्यावरून दोन महिला त्या शिशूच्या पालकांच्या पाठी जबरदस्ती करत होत्या. महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिचे मुल दत्तक देण्याबाबत अडवणूक तसेच जबरदस्ती केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोन संशयिता महिलांना अटक केली आहे.
फैमिदा काझी ५२,रा.पावस,रत्नागिरी आणि संगिता शिंदे ५१,रा. रत्नागिरी अशी अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात संचिता सुभाष यादव ३१, रा.सरोदेवाडी संगमेश्वर, रत्नागिरी यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानूसार, मार्च २०२२ मध्ये संशयित महिलांनी संचिता यादव यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे बाळ दत्तक देण्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर संचिता यादव जिल्हा शासकिय रुग्णालयात असताना १४ एप्रिल ते १६ एप्रिल २०२२ त्यांच्या परवानगीशिवाय संशयित महिला त्यांच्यासोबत रुग्णालयात राहिल्या होत्या. त्यानंतर १६ एप्रिल रोजीच संशयित महिलांनी संचिता यादव यांना मुलासह एका लॉजिंगवर नेउन सारखे मुल दत्तक देण्याबाबत अडवणूक करत होत्या.
तसेच संचिता यादव यांच्या पतीकडून लॉजिंग आणि जिल्हा शासकिय रुग्णालयात झालेल्या खर्चाबाबत ५ हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी यादव यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी सोमवारी संशयित महिलांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अशा घटना रत्नागिरी सारख्या लहान शहरामध्ये देखील घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.