शहराजवळच्या हयातनगर येथे बंद घर फोडून ८२ हजारांचा ऐवज लांबविणाऱ्या संशयित महिलेला पोलिसांनी जेरबंद केले. चोरीमध्ये चोरीचा नवा फंडा उघड झाला आहे. मला बाहेर जायचे आहे; परंतु माझ्याकडे कुलूप नाही, असे सांगून शेजाऱ्याचे कुलूप घ्यायचे. त्याची बनावट चावी तयार करून चोरी करायची, अशी चोरीची नवी पद्धत या प्रकरणामुळे उघड करण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. रूहिन अजिज हकीम (वय ३७, रा. हयातनगर) असे संशयित विवाहितेचे नाव आहे. संशयित महिलेकडून सोन्याच्या दागिन्यासह रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.
बनावट चावीने दरवाजा उघडून तिने ही चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हयातनगर हाउसिंग सोसायटीमधील ब्लॉक नं. ३०३च्या मुख्य लाकडी दरवाजाला लावलेले कुलूप काढून संशयित चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लाकडी बेडमध्ये ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेले ३० हजारांची एक सोन्याची बांगडी, १६ हजारांचे कानातील जोड, १२ हजारांची चेन, असा ८२ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता. या प्रकरणी सफुरा जाविद डांगे (४३) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ‘चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हरमळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक सावंत करत होते. तपास करत असताना हयातनगर येथीलच एक महिला छोट्या चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली. रूहिन हकीम या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू असताना तिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीला गेलेले दागिने, रोकड हस्तगत केली. चौकशीदरम्यान रूहिन हकीम हिची चोरीची नवी पद्धत पुढे आली आहे. एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रूहिनने आपल्याला बाहेर जायचे आहे.
कुलूप नसल्याने तुमचे कुलूप द्या, असे सफुरा डांगे यांना सांगून ती कुलूप व चावी घेऊन गेली होती. त्यानंतर पुन्हा तिने कुलूप आणून दिले. याच कालावधीत तिने त्या कुलपाची बनावट चावी तयार करून घेतली. ज्या वेळी सफुरा डांगे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या त्याच वेळी त्यांची मुलगी मावशीकडे रात्री झोपण्यासाठी गेली होती. याच संधीचा फायदा घेत रूहिनने बंद ब्लॉकचे कुलूप उघडून आत प्रवेश करून आतील ऐवज लांबविल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
असा लागला सुगावा – हयातनगरमध्ये एक महिला छोट्या-मोठ्या चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. संशयित महिला तुमच्या संपर्कात आहे का, अशी विचारणा पोलिसांनी सफुरा डांगे यांना केली. त्यांनीही संशयित महिला आपल्याकडे येऊन गेली होती. काही दिवसांपूर्वी तिने आपले कुलूप आणि चावी घेऊन गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि हे प्रकरण उघड झाले.