भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेले. त्याच्या दौऱ्यानंतर अवघ्या २ दिवसांत माजी खा. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे सोशल मिडियावर जाहीर केल्याने सिधुदुर्गसह कोकणच्या राजकारणात खळबळ उडाली असून निलेश राणेंच्या ट्विटचे कनेक्शन बावनकुळे यांच्या दौऱ्याशी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्या दौऱ्यात नेमके घडले तरी काय? याचीही उलटसुलट चर्चा रंगली असून भाजपामधील वातावरण ढवळून निघाले आहे. कुडाळ-मालवण या मतदार संघात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी निलेश राणे इच्छुक आहेत. तशी त्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र एकाच घरात दोघांना तिकीट मिळेल का अशी शंका (?) उपस्थित करणारी चर्चा तत्काळ सुरु झाली होती.
राणे समर्थक आणि भाजपचे जुने कार्यकर्ते यांच्यामध्ये ही चर्चा जोरात ऐकू येत होती. मी तिकीट आणून दाखवतो असेही निलेश राणे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे भाजपा वर्तुळात चर्चिले जात आहे. यामुळे निलेश राणे अस्वस्थ होते असे बोलले जात आहे. निलेश राणे यांना कुडाळ मालवण मतदारसंघातून उमेदवारी मिळेल याबाबत कोणतीही ठोस शाश्वती भाजप पक्षश्रेष्ठींकडून दिली जात नसल्याने एवढी मोर्चेबांधणी करून उपयोग काय? असाही सूर चर्चेमध्ये आळविण्यात येत होताच. या पार्श्वभूमि वर मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात कुडाळ-मालवण या विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष कडून या अस्वस्थतेत अधिकच भर पडली, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
निलेश राणेंचा मूडऑफ ? त्यामुळे बावनकुळे यांच्या दौऱ्यातच निलेश राणे यांचा मूड ऑफ झाला असल्याचेही काही कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. निलेश राणे सावंतवाडीतील कार्यक्रमातही सहभागी झाल्याचे दिसले नाहीत. भाजपकडून विश्वासात घेतले जात नाही असा एकंदरीत त्यांच्या सभोवतालच्या कार्यकर्त्यांचा सूर होता. दुसरीकडे विकास निधीबाबतही त्यांनी वारंवार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, असे बोलले जाते. मालवण मतदारसंघातील विकास निधी विरोधी पक्षाला दिला जातो अशा तक्रारी काही नगरसेवकांकडून त्यांच्याकडे करण्यात आल्या ही बाब त्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनासही आणून दिली पण याबाबत काहीच सुधारणा झाली नाही अशी चर्चा सुरु आहे.
उलट ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनाच जास्त निधी दिला जातो अशा तक्रारी भाजप गोटातूनच करण्यात आल्याचे बोलले जात आहे. केंद्रियमंत्री ना. नारायण राणे यांना निधी वाटपासह पदाधिकारी नियुक्त्यांमध्येदेखील विश्वासात घेतले जात नसल्याचे राणेसमर्थकांमध्ये चर्चिले जात होते. या पार्श्वभूमिवर अचानक निलेश राणेंनी निवृत्ती घेत असल्याचे सोशल मिडियावर जाहीर करताच सिंधुदुर्ग भाजपमध्ये पक्षांतर्गत सुरु असलेल्या कुरबुरी चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरु झाली आहे.या पार्श्वभूमिवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यात या कुरबुरींवर तोडगा काढत विधानसभा उमेदवारीबाबत काही संकेत मिळतील अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र तसे काही घडले नाही आणि त्याची परिणिती निलेश राणेंनी सोशल मिडियावर ट्विट करत निवृत्तीची घोषणा करण्यात झाली अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.