‘रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला, त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी, त्यांनी कोणतीही , सीमा ठेवली नाही, निर्लज्जपणाचे कळस गाठले, आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने शिवसेना दिली आहे. निर्लज्जपणे पत्र पाठविले आणि आमच्यावर ५० खोक्यांचे आरोप करता? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करत जोरदार टीका केली. शिवसेनेच्या (शिंदे गट) आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविला. एका क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी रुपये द्यायला हवे असे देखील त्यांनी सांगितले. खोके आणि ओकेवर मी बोलणार नाही असेही ते म्हणाले. आत्ताच एक मेळावा दादरमध्ये सुरु आहे. तोच थयथयाट आणि तीच आरडाओरड सुरु आहे. फक्त तारीख बदलली, दुसरं काही नाही. थयथयाट करण्यापलिकडे आता हाती काही राहिले नाही याची जाणीव त्यांना झाली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला. मराठा समाजाला आश्वासन या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी शिवरायांसमोर नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देवू असा शब्द दिला.
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार म्हणजे देणार, या एकनाथ शिंदेच्या शरिरामध्ये जोवर रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, शिवरायांची शपथ घेवून सांगतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होवून सांगतो आरक्षण देणार. कृपया टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करु नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, जीव दिल्याने आरक्षण मिळणार नाही, कुटुंब उघड्यावर पडेल, आरक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे, तुम्ही जीव देवू नका, आनंदाने जगा असे आवाहनदेखील या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील तरुणांना दिले. सरकार काहीच काम करत नसल्याचा आरोप त्यांनी अनेक उदाहरणे देत फेटाळून लावला.