कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी पाहणी केली होती. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली आणि हा विषय मागे पडला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निरामय हॉस्पिटलबाबत आनंदाची बातमी दिली आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधनी संस्थेने पुढाकार घेतला असून, राज्य सरकारने या विषयात सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मंत्री सामंत मार्गताम्हाणे येथील कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. गुहागर तालुक्यात मोठे हॉस्पिटल नसल्याने रुग्णाची मोठी गैरसोय होते.
दोन वर्षांच्या कोरोना संकटात रानवी येथे दाभोळ वीज प्रकल्प चॅरिटेबल ट्रस्टने येथील नागरिकांसाठी उभारलेले निरामय हॉस्पिटल सुरू व्हावे, अशी गुहागर तालुकावासीयांची आग्रही मागणी होती. २०२२ मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी निरायम रुग्णालय अधिग्रहित करण्याबाबत तहसीलदार गुहागर यांना पत्र पाठवले होते. त्यानुसार कार्यवाही करत तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासी वसाहतीमधील काही खोल्या ताब्यात घेतल्या होत्या. येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत ग्रामीण
रुग्णालय गुहागरला कळवण्यात आले होते. शासनाकडून इमारत आणि परिसरातील साफसफाई आणि देखभालीचे काम करण्यात आले होते. येथील अंतर्गत प्रकाशव्यवस्था, ऑक्सिजनच्या वाहिन्या, जलवाहिन्या उत्तम असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले होते. तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या रुग्णालयाची पाहणी केली होती; मात्र, कोरोनाची लाट ओसरताच या विषयाकडे दुर्लक्ष झाले. हे हॉस्पिटल आरोग्यसेवा पुरवण्यासाठी योग्य असल्याचे सांगून पुणे येथील ज्ञान प्रबोधनी संस्थेने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यशासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.