रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर आजही शिवसेनेचा दावा असून, तशी मागणी शिवसेनेकडून केली आहे, असा पुनरुच्चार पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथील कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे या जागेवरील शिंदे गटाचा दावा कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. मागील आठवड्यात लांजा येथे आलेल्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही कमळ चिन्हावरच लढवली जाणार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे शिंदे गटाला ही जागा मिळणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.
या जागेवरून शिंदे गटाकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांचे नाव पुढे येत आहे. त्या दृष्टीने नियोजनही सुरू केलेले आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये भाजप-शिंदे शिवसेनत चुरस निर्माण झाली आहे तसेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही कमळावर उमेदवार लढण्यासंदर्भात सूचक विधान केले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र लांजा येथे आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी लोकसभा जागेविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, रत्नागिरी-लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा आजही दावा आहे तसेच शिवसेनेने तशी मागणीदेखील केलेली आहे.
मात्र, जेव्हा नेते ठरवतील कोण उमेदवार द्यायचे, त्यानंतर प्रचाराची सुरवात होईल. ही जागा कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची, हे शिवसेनेच्यावतीने सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकार दिले आहेत. तसेच भाजपनेदेखील कोणत्याही कार्यकर्त्याला तसे अधिकार दिलेले नाहीत. त्यांचे नेतृत्व जागेचा निर्णय ठरवतील तर राष्ट्रवादीचे नेतृत्व उपमुख्यमंत्री पवार ठरवतील. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.