इलेक्ट्रीक दुचाक्यांकडे भविष्यातील पर्याय म्हणून पाहिले जात असताना, गेल्या काही काळामध्ये इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण चालली आहे. अनेक लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाल्याने केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या स्कूटरचे लॉन्चिंग तत्काळ थांबवण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत.
रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रीक दुचाकींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. केंद्राने दुचाकींना आग लागण्याच्या घटनांची गंभीर दखल घेतली असून याबाबत कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. इलेक्ट्रीक स्कूटरला अचानक का आग लागतेय याचा तपास जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत स्कूटर, बाईकचे लॉन्चिंग थांबवावे, असे आदेश कंपन्यांना देण्यात आले आहेत.
कोणत्याही कंपनीनं त्यांच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास मोठा दंड आकारला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील, वाहन कंपन्यांनी त्यांच्या दोष असलेल्या वाहनांच्या सर्व बॅच ताबडतोब परत मागवाव्यात.
दुचाकींना लागणाऱ्या आगीचे कारण स्पष्ट होत नाही किंवा त्यावर उपाययोजना, दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत इलेक्ट्रीक कंपन्यांनी त्यांच्या नव्या स्कूटर लाँच करू नयेत. केंद्र सरकारनं जरी नव्या इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास बंदी घातली असली तरी, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी विकण्यास कोणतही मज्जाव करण्यात आलेला नाही अथवा बंधने घालण्यात आलेली नाही आहेत. परंतु, वारंवार आग लागण्याच्या किंवा बिघाड होण्याच्या तक्रारीमुळे बाजारात सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आणि याआधी विक्री झालेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत. गडकरींनी केलेल्या सूचनेनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी तपासणीसाठी माघारी बोलवल्या आहेत.