अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळा सर्वत्र जल्लोषात साजरा केला जात असतानाच जुन्या बाबरी मशिदीचा फोटो ठेवून धमकी देणाऱ्या आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह इंस्टाग्राम स्टोरी व स्टेटस काही तरुणांनी ठेवल्याने मंगळवारी समाज बांधवांनी आक्रमक होत पोलिस स्थानकावर धडक दिली. या घटनेची पोलीसांनी तात्काळ दखल घेत याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. येथील कांही तरूणांनी जुन्या बाबरी मशिदीचा फोटो ठेवून धमकी देणारा इंस्टाग्राम स्टोरी व स्टेटस ठेवल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली.
दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी ही आक्षेपार्ह पोस्ट असल्याने समाज बांधव संतप्त झाले. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी युवासेनेचे तालुकाप्रमुख निहार कोवळे, मनसे शहराध्यक्ष अभिनव मूरण, खेर्डीचे उपसरपंच विनोद भूरण, माजी नगरसेवक आशिष खातू, हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे, भाजपा शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, प्रणय वाडकर आदीसह जमावाने मंगळवारी सकाळी पोलीस स्थानकावर धडक दिली.
संतापलेले कार्यकर्त्यानी अटकेची मागणी लावून धरली. संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यासाठी सुमारे २ तास चर्चा सुरू होती. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याकडे जोरदार दाद मागण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी राजमाने यांच्या सुचनेनुसार तत्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली. याशिवाय इंस्टाग्राम अकांऊटवर असलेल्या उर्वरीत पाच जणांवरही गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.