25.5 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना…

क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा...
HomeDapoliगोवा किल्ल्याचे रूपडे पालटणार, निधीला मान्यता

गोवा किल्ल्याचे रूपडे पालटणार, निधीला मान्यता

पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडून प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक सादर केले होते.

येथील गोवा किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीसाठी शासनाने ६ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच गोवा किल्ल्याचे रूपडे पालटणार असल्याने इतिहासप्रेमी पर्यटक व दुर्गप्रेमी यांना दिलासा मिळणार आहे. दापोली तालुक्यामध्ये एकमेव असे हर्णे गाव आहे जेथे गोवा, फत्तेगड, कनकदुर्ग हे भुईकोट व सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग अशा चार किल्ल्यांचा इतिहास आहे. येथील गोवा किल्ल्याला संरक्षक असलेली काळ्या पाषाणाची तटबंदी अनेक वर्षांपासून ढासळत चालली होती. हा किल्ला हा संवर्धनाच्या प्रतीक्षेत होता. या किल्ल्यात असलेल्या ऐतिहासिक खुणा या आधीच भग्नावस्थेत गेलेल्या आणि त्यात तटबंदी ढासळू लागल्यामुळे इतिहासाच्या वैभवशाली पराक्रमाच्या खुणा नष्ट होत चालल्या होत्या.

उशिराने का होईना; पण आता याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले आहे. ६ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नुकताच जारी केला. या किल्ल्याची तटबंदीचे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा स्थानिकांमधून केली जात आहे. पर्यटनप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याबद्दल इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडून प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक सादर केले होते. त्याला मान्यता मिळाली आहे.

राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांची यावर नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डचांच्या तीन जहाजांवर हल्ला इ. स. १७५४ मध्ये आंग्ग्रांच्या आरमाराने गोवा गडाजवळ डचांच्या ३ जहाजांवर हल्ला केला. त्यात डचांची २ जहाजे जळाली व तिसरे पूर्ण मोडकळीस आले. या प्रसंगात आंग्ग्रांची काही जहाजे जळालेली माहिती सांगितली जाते. १६ एप्रिल १७५५ दरम्यान रामाजी महादेव यांनी आंग्ग्रांचे जे ७ किल्ले घेतले त्यामध्ये गोवा किल्लाही होता. १७५५ मध्ये पेशव्यांचा इंग्रजांशी तह झाला. त्या तहानुसार गोवा गड इंग्रजांनी कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली जिंकून पेशव्यांच्या ताब्यात दिला.

RELATED ARTICLES

Most Popular