पिंपळी-खडपोली पूल कोसळून तब्बल वीस दिवस उलटून गेले तरी एमआयडीसीकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने ग्रामस्थ व उद्योजक हवालदिल झाले आहेत. शनिवारी अखेर एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र वीस दिवसांनी केलेली ही पाहणी म्हणजे वरातीमागून घोडे नाचवल्यासारखी असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. २३ ऑगस्ट रोजी रात्री पिंपळी खडपोली पूल कोसळला. हा पूल दसपटी, खडपोली एमआयडीसी परिसरासह औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा दुवा होता. पुलाच्या कोसळण्याने चाकर्मान्यांना, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना आणि उद्योजकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. पर्यायी मार्गाने मोठा वळसा घ्यावा लागतो, त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्ययं होत आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पाहणी करून पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होईल असे जाहीर केले होते. मात्र आता वीस दिवस उलटून गेले तरीही कोणती ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. शनिवारी अखेर अधीक्षक अभियंता सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता सतीश पवार आणि उपअभियंता संदीप पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.
तथापि, त्यांनी केवळ औपचारिक चौकशी करून पुढील प्रक्रिया सुरू आहे एवढेच सांगितले. ग्रामस्थांनी या पाहणीवर टीका करत हे सर्व वरातीमागून घोडे नाचवल्यासारखे आहे असा संतप्त सूर लावला. १९६५मध्ये बांधलेला हा पूल गेल्या काही वर्षांपासून जिर्णावस्थेत होता. दोन-तीन महिन्यांपूर्वीच उद्योगमंत्र्यांनी तो पाडून नवा पूल उभारण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, एमआयडीसीने या सूचनांकडे दुर्लक्ष केले, सार्वजनिक बांधकाम विभागाने एनओसी व अन्य तांत्रिक प्रक्रिया वेळेत केली नाही, असे सांगितले गेले, परंतु एमआयडीसीचा पाठपुरावा कमी पडला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निष्क्रियतेमुळेच पुलाचा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पूल बंद झाल्यामुळे खडपोली औद्योगिक वसाहतीतील उत्पादन आणि मालवाहतूक काही प्रमाणात ठप्प झाली आहे. उद्योगपतींना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, तातडीने पूल – उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.

