रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची बेफिकीर हुल्लडबाजी दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्दे समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगात थार गाडी चालवून ती पलटी झाल्याची घटना ताजी असतानाच, शनिवारी सकाळी हर्णे बंदर परिसरात आणखी धक्कादायक प्रकार घडला. समुद्रात वाहन नेण्यास स्पष्ट मनाई असूनही काही पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करत कार थेट समुद्रात चालवत जीव धोक्यात घातला. या धाडसी कृत्त्यामुळे इतर पर्यटकांचा जीवित धोक्यात आला असून परिसरात मोठी भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पर्यटकांनी केलेल्या या बेफिकीर वागणुकीमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. यापूर्वीही कर्दे, हर्णे, मुरूड या परिसरात भरधाव वेगाने गाडी चालवणे, समुद्रकिनाऱ्यावर गाड्या उभ्या करणे, मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करणे अशा घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी व ग्रामपंचायतींनी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली “आहे. मात्र, आजवर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने हुल्लडबाज पर्यटकांचे मनोबल वाढले आहे.
पर्यटन हा जिल्ह्याचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असला तरी पर्यटकांच्या बेफिकीर वागफुकीमुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेला आणि नैसर्गिक संपत्तीला गंभीर धोका निर्माण होत आहे. पर्यटकांसाठी सुरक्षा नियम लागू करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे. या प्रकारांवर तातडीने अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर गस्त वाढवून कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

