मिरजोळे एमआयडीसी परिसरामध्ये विविध प्रकारच्या केमिकल, माश्यांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे त्या परिसरातील भागामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसी परिसरातील ओमेगा कंपनी फिशमिलचे सांडपाणी गटारांमध्ये सोडत आहे; पण दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात हे प्रदुषित सांडपाणी ओमेगा कंपनीने सोडल्याने, हे सांडपाणी थेट परिसरातील नाल्यातून रहिवाशी ज्या विहिरींचे पाणी पितात त्या विहिरीमध्ये उतरले आहे. या सांडपाण्यामुळे विहिरी दूषित झाल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप आहे.
पिण्याचे पाणी वापरल्या जाणाऱ्या परिसरातील अनेक विहिरीही सांडपाण्यामुळे प्रदुषित झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ही गंभीर बाब मिरजोळे ग्रामपंचायतीसमोर मांडण्यात आली. त्यानंतर येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी सांडपाणी सोडणाऱ्या एमआयडीसीतील ओमेगा कंपनीवर धडक दिली. संतप्त ग्रामस्थांनी कंपनीतील सांडपाणी सोडण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्याबाबत रत्नागिरीतील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी पाचारण केले.
शहराजवळच्या मिरजोळे एमआयडीसीतील ओमेगा फिशमिल कंपनीकडून परिसरातील गटाराला मोठ्या प्रमाणात कंपनीतील प्रदूषित सांडपाणी सोडण्यात आले. यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक झाला असून या प्रदूषणाला चाप बसावा यासाठी ग्रामस्थांनी कंपनीवर धडक दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारला. तसेच प्रदूषणाबाबत वस्तुस्थिती दाखवून दिली. कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी व ग्रामस्थांच्या विहिरीतील पाण्याचे नमुने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले. हे पाणी नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांनी सांगितले.
प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्या वेळी संतप्त ग्रामस्थांनी या पाण्याचे प्रदूषण दाखवून दिले. प्रदूषणप्रकरणी ओमेगा कंपनीच्या व्यवस्थापनालाही संतप्त ग्रामस्थांनी जाब विचारला; मात्र या प्रदुषणाबाबत असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा पारा चढला. सर्वांनी सांडपाणी बाहेर पडणाऱ्या परिसराची पाहणी केली.