राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक पर्यटनासाठी आरक्षित जागेत ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असून, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पात काय असणार, याचे सादरीकरण आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर करण्यात आले. उच्चस्तरीय समितीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे लवकरच याबाबत सादरीकरण करून मान्यता घेतली जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आज कुडाळ-मालवण विधानसभेसाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यानंतर मंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचे वास्तुविशारद अमित कामत यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. तेथे एकूण शासकीय मालकीची सव्वासहा एकर जागा आहे. ही जागा पर्यटन विकास, गार्डन आणि वाहने पार्किंगसाठी आरक्षित आहे. मालवण नगरपरिषदेच्या ताब्यात ही जमीन आहे. त्यामुळे प्रकल्प उभारण्यासाठी जागेची अडचण येणार नाही, असे सांगितले.
पालकमंत्री चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील व अन्य उपस्थित अधिकाऱ्यांनीही हे सादरीकरण पाहिले. मंत्री केसरकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता तेथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुतळा उभारत आहे. यासाठी २० कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे; मात्र त्याचबरोबर येथे भव्य असा पर्यटन प्रकल्प व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. त्यामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित तसेच शिवकालीन वास्तव दर्शवित असलेला प्रकल्प व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे. ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या नावाने हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न आहे.
या प्रकल्पात काय काय असेल, याची पीपीटी मी तयार केली आहे. याला पालकमंत्री चव्हाण यांनी मान्यता दिल्यानंतर किंवा त्यात बदल सुचविल्यानंतर याचे सादरीकरण राज्यस्तरावर असलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमोर याचे सादरीकरण केले जाईल. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.”