८४ वर्षाच्या वयोवृद्धाकडे जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची मानसिकता किती असू शकते, आणि राजकारणातील भीष्मपितामहा त्यांना का म्हटले जाते याचा प्रत्यय चिपळूण येथील खा. शरद पवार यांच्या दौऱ्यात दिसून आला. चिपळूण येथे मुक्कामी असलेल्या शरद पवारांनी अवघ्या १४ तासात तब्बल ६०० लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामध्ये राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, उद्योजक अशा अनेकांचा समावेश होता. त्यामुळे शरद पवारांनी येथील राजकीय वर्तुळ ढवळून काढल्याचे दिसून येत आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार रविवार व सोमवार या दोन दिवसीय चिपळूण दौऱ्यावर आले होते.
प्रत्यक्षात खा. पवार चक्क मुक्कामाला चिपळूणमध्ये आले हे पहिल्यांदाच घडले. त्यामुळे त्यांचा चिपळूण येथील मुक्काम हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. तसेच ते मुक्काम करणार म्हणजेच मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असे देखील राजकीय जाणकारांचे म्हणणे होते. आणि ते काहीअशी सत्य देखील ठरल्याचे आता तरी दिसून येत आहे.
भेटीगाठी सुरु – रविवारी रात्री १० वाजता खा. शरद पवार चिपळूणमध्ये दाखल झाले. बहादूरशेख येथील सहकार भवनात त्यांचा मुक्काम होता. येथे दाखल होताच त्यांनी लगेच पुढील कामाला सुरुवात केली. आलेल्या अनेकांच्या भेटीगाठी घेण्यास त्यांनी सुरुवात केली. नुसती विचारपूस नव्हे तर अडचण समस्या जाणून घेतानाच काही निवेदने देखील स्वीकारली. तसेच काहींकडे त्यांनी राजकीय विषयावर चर्चा देखील केली. हा सिलसिला रात्री उशिरापर्यंत सुरू होता. असेही ऐकण्यास मिळत आहे. चार चाकी गाडीतून प्रवास करून देखील न थकता ते सहज संवाद साधत होते. असेही काहींनी माहिती देताना म्हटले आहे.
भेटायला प्रचंड गर्दी – पहाटे लवकर उठून परत खा. शरद पवार आपल्या कामाला लागले. येथे आलेल्या प्रत्येकाला त्यांनी भेट देऊन चर्चा देखील केली. भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होती. पण एकालाही न थांबवता त्यांनी भेट दिली आणि दिलखुलास चर्चा देखील केली. त्यानंतर खा. शरद पवार थेट बाहेर पडले. त्यांनी चिपळूण येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तसेच राष्ट्रवादी संपर्क कार्यालय, माजी आम दार रमेश कदम यांचे निवासस्थान आणि माजी आमदार पत्रकार संपादक स्व. नाना जोशी यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली. येथे देखील त्यांनी अनेकांशी चर्चा केली.
मुस्लिम संस्थेला समाजाची भेट – पुढे खा. शरद पवार यांनी येथील चिपळूण मुस्लिम समाज संस्था उभारत असलेल्या बहुउद्देशीय प्रकल्पाला भेट दिली. येथील विश्वस्त मंडळींशी त्यांनी सविस्तर संवाद साधला. पूर्ण माहिती घेतली. तेथून पुढे न थांबता पुन्हा सहकार भवनात येऊन त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधत सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आणि नंतर जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते सभेच्या ‘ठिकाणी पोहचले. सभा आटोपल्यानंतर मात्र त्यांनी दुपारी जेवल्यानंतर रायगडकडे प्रयाण केले.
१६ तास मुक्काम – प्रत्यक्षात खा. शरद पवार यांचा चिपळूणमध्ये सुमारे १६ तास मुक्काम राहिला. त्यामध्ये जाहीर सभेचे दोन तास वगळता उरलेल्या १४ तास्वात आवश्यक तितकी विश्रांती घेऊन त्यांनी तब्बल ६०० लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आता झालेल्या भेटी आणि चर्चा या कोणत्या विषयावर होत्या ‘याचा तपशील उपलब्ध झाला नसला तरी भेटी घेणाऱ्यामध्ये राजकीय नेते, पदाधिकारी, संस्था संचालक आपिण उद्योजक यांचा देखील समावेश होता. चक्क ८४ वर्षाची वयोवृद्ध व्यक्ती १४ तासात ६०० लोकांच्या भेटीगाठी घेऊ शकतो हे फक्त शरद पवारच करू शकतात. असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.