चक्क गुरूवारी ७२५ शिक्षकांना एकाच वेळी कार्यमुक्त केले – रत्नागिरी जि. प. प्रशासन

151

जिल्ह्यात सध्या आंतरजिल्हा बदल्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. जि. प. प्रशासनाने गुरूवारी चक्क ७२५ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक परजिल्ह्यात गेल्याने जिल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबा उडणार आहे. विशेष म्हणजे रात्री १० वाजता या शिक्षकांना कार्यमुक्त केले. गेल्या बारा वर्षात प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यात सध्या ११०० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही परिस्थिती असताना आंतरजिल्हा बदलीने जाणार्या शिक्षकांची त्यामध्ये भर पडत आहे. यंदा ७२५ शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या यादीमध्ये आहेत. शासनाने यापूर्वी दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असतील तेथे शिक्षकांना सोडू नये असे आदेश होते; परंतु सरकारने तो नियम शिथिल करुन दोन महिन्यापूर्वी नव्याने शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना १ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यमुक्त करावे, अशा सूचना आंतरजिल्हा शासनाने काढले होते. बदलीसाठी या शासन निर्णयामध्ये बदलीसाठी दिलेल्या आदेशात विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करावेत असे नमूद केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची रिक्त पदे आणि शिक्षकांना सोडल्यानंतर होणारी रिक्त पदे यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम याचा विचार करत प्रशासनाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रशासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. हे मार्गदर्शन गेल्या आठवड्यात आले होते. यामध्ये शासनाने या शिक्षकांना सोडावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन कोंडीत सापडले होते. गुरूवारी मात्र अचानक प्रशासनाने या बदल्यांबाबत आपली भूमिका बदलत रात्री १० वाजता ७२५ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याचे आदेश आले. यामुळे हे शिक्षक आता आपापल्या जिल्ह्यात हजर होणार आहेत.