चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी नुकतेच शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेला लक्ष्य केले. यावेळी प्रताप शिंदे म्हणाले, विनोद झगडे यांच्याबरोबर कोणी नाही. जे दोन चार लोक त्यांच्या गाडीतून फिरतात तेवढेच लोक त्यांच्याबरोबर असतील. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्ष सोडताना कार्यकर्त्यांशी संपर्क केला. आपल्या अडचणी सांगितल्या आणि ज्यांना कोणाला माझ्याबरोबर यायचे आहे त्यांनी या असे आवाहन केले. मात्र पक्ष फोडण्याचा प्रयत्न किंवा खोटे आरोप त्यांनी केले नाही. सचिन कदम यांनी खासगी कारण देत पदाचा राजीनामा दिला, मात्र त्यांनी इतर कोणत्या पक्षात प्रवेश केलेला नाही किंवा ठाकरेंवर टिका केलेली नाही. चव्हाण यांनी त्यांच्या अडचणीत आम्हाला हाक मारली तर आम्ही शिवसैनिक त्यांच्यासाठी धावून जाऊ. विनोद झगडे संघटनेच्या जिवावर मोठे झाले.
आम्ही त्यांना संघटना वाढवण्यासाठी मोकळीक दिली होती. त्यांनी खोटे आरोप करू नये. आम्ही लवकरच शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहोत त्यातून आमची संघटना किती मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू. विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम म्हणाले, आमची संघटना मजबूत आहे. कार्यकर्ते फोडण्यासाठी विरोधी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र कडवट शिवसैनिक पक्ष सोडणार नाही. जे पक्ष सोडण्याचा विचार करतात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत. सुधीर शिंदे म्हणाले, शिवसेना फुटली तेव्हा याच विनोद झगडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर जहरी शब्दात टिका केली होती. त्या विनोद झगडे यांना एकनाथ शिंदे आणि भाजप कसा स्वीकारणार.
स्वबळावर लढवण्याची तयारी – भाजपकडून शहरात सदस्य मोहीम सुरू आहे. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना संघटना स्थापन झाल्यापासून आम्ही सदस्य नोंदणी करतो. दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. हे आमच्यासाठी नवीन नाही. चिपळूण पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवण्यास सांगितले तरी आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.