पुणे, स्वारगेट येथे घडलेल्या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांची सुरक्षा तपासण्यात आली आहे. सर्व बसस्थानके आगार, कार्यशाळा, टायर रिमोल्डिंग प्लँट आदी ठिकाणी जवळपास ७० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. खासगी कंपनीचे व एसटीचे जवळपास ५० सुरक्षारक्षक २४ तास कार्यरत असतात. शिवाय पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेस पोलिसांची जास्त वेळ गस्त ठेवण्यास सांगितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली आहे, अशी माहिती एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. सर्व बसस्थानकांमधील सीसीटीव्ही तपासण्यात आले. वस्तीला आलेल्या बस लॉक करण्याचे सक्त आदेश चालक, वाहकांना देण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस बसस्थानकात पोलिसांना गस्त घालण्याची विनंती एसटी विभागाने केली आहे. रत्नागिरी विभागातील सर्व बसस्थानकांच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
या अधिकाऱ्यांनी सर्व बसस्थानकांचे सीसीटीव्ही तपासले आहेत. त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी येणारे प्रवासी, विनाकारण येऊन थांबणाऱ्यांचाही आढावा घेण्यात आला तसेच भीक मागणारे बसस्थानकात निवारा करतात. यासंबंधीही कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. अशा लोकांना वेळीच त्या ठिकाणाहून बाहेर काढले जाणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटी बसची जबाबदारी चालक-वाहकांची असते. बस रिकामी झाल्यानंतर ती ज्या ठिकाणी वस्तीसाठी उभी करण्यात येते, त्या ठिकाणी ती आतून लॉक करणे गरजेचे असते. बसच्या सर्व काचा व्यवस्थित लावल्याची खातरजमा चालकांनी व वाहकांनी केली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बसस्थानकांमध्ये सुरक्षारक्षकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रोमिओंवर कारवाई होणार – शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर काही रोडरोमिओ विनाकारण बसस्थानक परिसरात येऊन तासन्तास थांबतात. असा प्रकार समोर आल्यास त्या संबंधी तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. गर्दीच्यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकदेखील प्रवाशांमध्ये सहभागी होतात. अशा लोकांवरही नजर ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.