सुवर्णसूर्य फाउंडेशन व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित ‘कोकण कोस्टल मॅरेथॉनमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण तथा भैय्या सामंत यांनी दिली. आतापर्यंत स्पर्धेसाठी ८०० हून अधिक स्पर्धकांनी नोंद केली आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे ७ जानेवारीला ५, १० आणि २१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. रत्नागिरीला धावनगरी बनवणारी ही स्पर्धा असून, या माध्यमातून रत्नागिरीच्या पर्यटनाला गती मिळणार आहे. या स्पर्धेची माहिती पालकमंत्री सामंत यांना देण्यात आली.
त्या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासन, शासन, वाहतूक पोलिस यांच्यासह सर्वांचे सहकार्य देऊया, असे सांगितले. ही स्पर्धा रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा होईल, अशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे. या स्पर्धेला क्रीडाक्षेत्रातील विविध संघटनांचेही सहकार्य करतील, असे आश्वासन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी दिले आहे. अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यामध्ये महिला, पुरुष यांचे वयोगटानुसार गट करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे, चषक देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेकरिता बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचेही बहुमोल सहकार्य मिळाले आहे. माळनाका, मारूती मंदिर, नाचणे रोड, काजरघाटी, सोमेश्वर, कोळंबे, फणसोप, भाट्ये या मार्गावर ही स्पर्धा रंगणार आहे. आतापर्यंत स्पर्धेसाठी ८०० हून अधिक स्पर्धकांनी नोंद घेतला आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनीही स्पर्धेत नावनोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे ही स्पर्धा नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध होईल याकडे सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने विशेष लक्ष दिले आहे.