शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल कोसळल्यानंतर आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक झाली होती. त्याचवेळी महामार्गावरील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड दोन मीटरने वाढवण्याचे ठरले होते. तशा सूचनाही ठेकेदार कंपनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आल्या; मात्र दीड महिन्यानंतरही या रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वाढते अपघात लक्षात घेता सर्व्हिस रोडचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत करण्यात आली.
दीड महिन्यापूर्वी बहादूरशेखनाका येथील नव्याने होणारा उड्डाणपूल कोसळला होता. सध्या हा पूल निकामी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत आमदार शेखर निकम यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या समवेत, ठेकेदार कंपनी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे विभागीय कार्यकारी अभियंता तसेच पोलिस अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोड दीड ते दोन मीटरने वाढवणार असल्याचे सांगितले होते तसेच उड्डाणपुलाखालील जमिन सपाटीकरण करण्याचे ठरले होते.
पाग पॉवर हाऊस चौकात वाहनांची गती कमी करण्यासाठी रम्बलर टाकण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार गतिरोधक व जमिन सपाटीकरणाची कामे मार्गी लागली; मात्र रस्त्याचे रूंदीकरण झालेले नाही. अरूंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त पार्किंग याला जबाबदार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवक अध्यक्ष नीलेश कदम आदी उपस्थित होते.