ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकिपर्स संघटनेने नुकतेच हिवाळी अधिवेशनादरम्यान रेशन दुकानदारांच्या मागणीसाठी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष गणपत बाबा डोळसे पाटील, ज्येष्ठ कार्याध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रत्नागिरी जिल्हा आरक्षण दुकानदार केरोसिन व मालक- चालक संघटनेचे खजिनदार रमेश राणे तसेच रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रेशन दुकानदार आपल्या मागण्यांसाठी शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत; मात्र, तितकेसे यश मिळताना दिसत नाही. पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान रेशन दुकानदारांनी मोर्चा काढला. ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकीपर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
या वेळी शासनाला निवेदन देण्यात आले. आजच्या महागाईच्या निर्देशांकानुसार कमिशनमध्ये वाढ करून मिळावी. डिसेंबरपर्यंत लाभार्थ्यांना धान्य वितरण झालेले संपूर्ण कमिशन त्वरित जमा व्हावे. वितरणासाठी ५G जलदगतीने नेटवर्कचे ई-पॉस मशिन त्वरित मिळावे. दरमहा मोफत अन्नसुरक्षा अंतर्गत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण झालेले वेळोवेळी कमिशन त्वरित मिळावे, राज्यातील सर्व योजनेंतर्गत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना वितरणासाठी धान्य उपलब्ध करून मिळावे, राज्यातील सध्या बंद असलेली केरोसिन परवानाधारकाचे पुनर्वसन होणे व त्यांना वितरणासाठी केरोसिन कोठा उपलब्ध करून देण्यात यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.