सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील परशुराम घाट रस्त्याकरिता पर्यायी मार्ग म्हणून आंबडस चिरणी लोटे मार्गाला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेला हा मार्ग आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
सध्या परशुराम घाटाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतो व वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे खेड तालुक्यात या मार्गाचा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाने खुला केला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आंबडस चिरणी लोटे या इतर जिल्हा मार्ग ४२ या रस्त्याची एकूण लांबी ७.२५० कि.मी. व डांबरी पृष्ठभाग ३.७५ मीटर रूंदीचा आहे. या रस्त्यावर आंबडस, चिरणी व लोटे अशी गावे लागतात.
हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हस्तांतरित होणार असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती लवकरच हाती घेणे शक्य होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व जनतेने सदर पर्यायी मार्गासाठी केलेल्या विनंतीनुसार हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागकडे हस्तांतरित करण्याची शासकीय प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.
सदर रस्ता पनवेल पणजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मध्ये असणाऱ्या परशुराम घाटाला पर्यायी मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरी करण्याचे काम प्रगतीत असून सदर घाट रस्त्याच्या लांबीमध्ये पावसाळ्या दरम्यान दरडी कोसळल्यामुळे वाहतुक वारंवार बंद करावी लागत आहे. आंबडस चिरणी लोटे इजिमा-४२ परशुराम घाट रस्त्याकरिता पर्यायी मार्ग हा रस्ता एक विशेष बाब म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग १०९ असा दर्जोन्नत करण्यात येत असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.