रत्नागिरी शहरातील सुमारे वीस टनांहून अधिक ओला-सुका कचरा साळवीस्टॉप येथील पाणीपुरवठा टाकीच्या जवळ डंपिंग केला जात आहे. कचरा डंपिगसाठी एमआयडीसीकडून पाच एकर जागा दिली जाणार आहे. मात्र, नगरपालिकेकडून एक महिन्यापूर्वी गेलेला प्रस्ताव एमआयडीसीच्या अंधेरी येथील कार्यालयात पडून आहे. रत्नागिरी शहराची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. गृहनिर्माण सोसायटींची संख्याही वाढत आहे. रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी पालिकेकडून कचरा नियमित उचलण्याचे नियोजन केले जाते. संकलित केलेला कचरा गाड्यांमध्ये भरून साळवीस्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. मात्र, हा साचलेला कचरा जाळला जात असल्याने जवळच राहणाऱ्या हजारो नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
यावर उपाययोजना म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीतील पाच एकर जागा कचरा डंपिंगसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणूक लागल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेला नाही. जागा मिळविण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव पालिकेने एमआयडीसीला एक महिन्यापूर्वीच मुंबईतील कार्यालयात पाठवला आहे. संबंधित कार्यालयाकडे पालिकेकडून पाठपुरावाही केला जात आहे. मात्र, अद्याप हा मंजूर झालेला नाही. साळवी स्टॉप परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोक राहत आहेत. त्यामुळे नवीन डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न वेळेत सुटला तरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी विशेष नियोजन करणे गरजेचे आहे.