दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र काही वेळानंतर पावसाने उघडीप घेत कडक उन्ह पडल्याने सर्वांचीच निराशा झाली. दरम्यान, या पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखल साचल्याने प्रांत कार्यालय व चिपळूण पंचायत समितीसमोर दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या काही घटना घडला. या परिसरात खडी टाकण्याची मागणी नागरिक व वाहनधारकांमधून केली जात आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांसह उकाड्याने हैराण झालेला नागरिक चिंतेत पडला आहे.
हवामान खात्याने मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी २३ जूनपासून मॉन्सून सक्रिय होईल अशी शक्यता वर्तविली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण व रत्नागिरी भागात शुक्रवारी सकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. काही वेळानंतर या भागात पावसाच्या हलक्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मात्र चिपळूण तालुक्यात सकाळी ११ वाजल्यानंतर कडक उन पडले. सायंकाळपर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी निराश झाला. दरम्यान, चिपळुणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत.
पावसामुळे प्रांताधिकारी कार्यालय व पंचायत समितीसमोर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हा चिखल दोन सर्व्हिस रोडच्या मधोमध होता. त्यामुळे रस्ता क्रॉस करतेवेळी तो चिखल महामार्गावर आला. या चिखलात महामार्गावरून धावणाऱ्या काही दुचाकी घसरून पडल्या. यामध्ये वाहनधारक व दुचाकीच्या मागे बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. या अपघातात एक वयोवृद्ध महिलाही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला गेला. पावसाळा सुरू झाल्यानंतर येथे पुन्हा तीच परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे त्यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.