अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांची तयार झालेली पिके वाहून गेलीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हानिहाय आढावा मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला. आणि कोणत्याही परिस्थितीत अडचणीतील शेतकरी आणि नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुराच्या पाण्यातून जवानांनी अडकलेल्या ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागांतून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. पंचनामा झाल्यावर सर्व मदत तत्काळ पोहोचवण्यात येईल असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विनाअट तातडीने ५०,००० रूपयांची मदत सरकारनं जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु मालमत्तेचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ओढवलेली वेळ हि आणीबाणीची आहे.’
आधी कोरोना महामारी आणि आता अतिवृष्टी, पूर यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृती करण्याची गरज आहे.’ अशा वेळेस शासनाचे पंचनाम्यांचे सोपस्कार नंतर सुद्धा होतच रहातील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ५०,००० रूपयांची तातडीची मदत सरकारने जाहीर करावी.
तयार पीक शेतीच्या नुकसाना सोबतच घर व पाळीव गुरेही पुरात वाहून गेल्याने, या नुकसानीचाही विचार करून मदत देण्यात यावी. परंतु तोपर्यंत वाट बघण्याची ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे उरलेली नाही, ह्याचा त्वरित विचार होऊन वेगाने पावलं टाकावीत. त्याचप्रमाणे ही ओढवलेली कठीण परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.