पालकमंत्री ना. उदय सामंत यांना यांच्या रत्नागिरी विधानसभा मर्ता हरवायला मला आवडलं असतं परंतु लांजा-राजापूर मतदारसंघ ही माझी कर्मभूमी असून २००६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या विधानसभा मतदारसंघात पाठविले आहे. यामुळे लांजा-राजापूर हाच माझा अखेरपर्यंत मतदारसंघ राहणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते आणि लांजा-राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी केले आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी निवडणुकीत शिवसेनेत बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पराभूत करण्याचा संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने राजापूरचे विद्यमान आमदार आणि शिवसेना उपनेते राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आ. राजन साळवी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा माझी जन्मभूमी असली तरी कर्मभूमी लांजा राजापूर मतदार संघ आहे. २००६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या विधानसभा मतदारसंघात पाठवले होते. सुरुवातीला मी पडलो असलो तरी याच मतदारसंघात राहून चार वर्षे लोकांची सेवा केली. त्यानंतर गेली १५ वर्षे मी या मतदारसंघात लोकांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे सातत्याने निवडून येत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मला नक्कीच ना. उदय सामंत यांना हरवायला आवडले असते. परंतु राजापूर विधानसभा मतदारसंघ हा माझा मरेपर्यंत मतदारसंघ राहणार असल्यामुळे लोकांच्या प्रेमामुळे मी अन्य कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.