कोकाकोला कंपनीचा अर्ज तुमच्याकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर कधी आला होता, तो अर्ज दाबून ठेवत आदित्य कंपनीच्या लोकांना मातोश्री वर अडीच वर्ष का बोलावत होते? मुंबई महानगरपालिकेत आजवर काय केलेत? मुंबईतून मराठी माणूस आज कल्याण, बदलापूर, वसई, नालासोपारा अंबरनाथ इकडे घालवण्याचे पाप कोणी केले? आदी प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना उघड आव्हान दिले आहे. मंगळवारी रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्यासह सामंतबंधूंवर आरोप केले. हे आरोप खोटे असल्याचे सांगत रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरेंना वरील सवाल विचारले आहेत.
तुम्ही बोटे कुणाकडे दाखवत आहात? – एअरपोर्ट तुम्ही कोणाच्या खिशात घातलात? कशाला दुसऱ्यांकडे बोटे दाखवत आहात? त्यामुळे आता मी आपल्याला इतकेच सांगेन की आता लोकांना फसवण्याचे धंदे थांबवा, तुमची सहानुभूती तर निघून गेलीच, आता खोटं बोल पण रेटून बोल हे प्रकार थांबवा असा जाहीर सल्लादेखील रामदासभाई कदम यांनी
उद्धव ठाकरेंना दिला आहे.
काय केलेत ते सांगा – अडीच वर्षात तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलेत हे सांगा. गेल्या अडिच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सव्वा दोनशे लोकाभिमुख निर्णय घेतल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केले असा सवाल रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना केला आहे.
फयानच्यावेळी कुठं होतातं ? – कोकणात फयानसारखं वादळ आलं तेव्हा कुठे होतात? शेवटी शरद पवारांना सांगाव लागलं उद्धवजी आता बाहेर पडा. कोकणात फयान सारखं मोठं वादळ आलं तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखे ८४ वर्षांचे ज्येष्ठ नेते कोकणामध्ये चार दिवस येऊन ठाण मांडून बसले आणि त्या माणसाने कोकणी माणसाचे अश्रू पुसले असे रामदास कदम म्हणाले.