रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावे संपर्कात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार प्रयत्न सुरू आहेत. नेटवर्क नसलेल्या गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. पुढील ५०० दिवसात अधिकाधिक गावे संपर्क क्षेत्रात आणण्याचे लक्ष्य भारत संचार निगमने हाती घेतले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती रत्नागिरी महाप्रबंधक संजय कुलकर्णी यांनी दिली आहे. अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणाने अनेक ग्रामीण भागामध्ये मोबाईलला नेटवर्क अतिशय कमकुवत होते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये देखील अडी अडचणीच्या काळात येणाऱ्या नेटवर्कच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण २१३ ठिकाणी भारत संचार निगम मोबाईल टॉवरचे काम करणार आहे. त्यात नेटवर्क नसलेली ११४ गावे, ज्या गावांमध्ये पूर्वीचे मोबाईल टॉवर आहेत, अशा ७६ टॉवरची सुधारणा करणे आणि नव्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मोबाईल टॉवरला ४ जी सुविधा पुरविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नेटवर्क सुविधा अधिक भक्कम होवून संपर्काचे साधन गतीमान होणार आहे.
चिपळूणमध्ये एकूण मोबाईल टॉवर ३२ असुन त्यापैकी २० नव्याने उभारणार, तर ९ टॉवरची सुधारणा करण्यात येणार आहे. तालुक्यातील ३ टॉवरला ४ जी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दापोलीत एकूण मोबाईल टॉवर प्रस्तावित ३७ असून नेटवर्क नसलेल्या १७ नवे मोबाईल टॉवर उभारण्यात येणार, तर तालुक्यातील १७ टॉवरची सुविधा आणि ३ टॉवरला ४ जी नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात नेटवर्क संदर्भात काहीही समस्या राहणार नाही असा संकेत दिसत आहे.