गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना व्हायरसचे संक्रमण सुरु झाल्यापासून रत्नागिरीतील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. परंतु, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला सहाय्य करणाऱ्या व्यापार्यांमध्ये मात्र अजूनही नाराजी असल्याचे बघावयास मिळत आहे. रत्नागिरीमध्ये शासनाने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यानुसार सुमारे ७० टक्के अस्थापना उघडण्यास परवानगी मंजूर केली आहे, मात्र त्यातील अजूनही ३० टक्के अस्थापना बंद आहेत.
व्यापार्यांनी मागील सव्वा वर्षापासून ठेवलेल्या संयमाचा आता कुठेतरी अंत होत असल्याचे समोर येत आहे. ७० टक्के अस्थापना व्यवस्थित सुरु आहेत, मात्र ३० टक्के अस्थापना सुरु केल्यास कोरोनाचा फैलाव होतो हे गणितच पटण्यासारखे नाही आहे असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून कडक संचारबंदी स्वीकारून, व्यापार उद्योगधंदे बंद ठेऊनही जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा काही कमी करण्यास प्रशासनाला यश आलेल नाही आणि व्यापाऱ्यांवर त्याचा आळ घेतला जातो आहे, हे पूर्णत: चुकीचे असल्याचे मत व्यापार्यांनी व्यक्त केले आहे.
त्यामध्ये सकाळी दुकान उघडायला आल्यावर व्यापारी म्हणजे चोर असल्यासारखे त्यांना हटकले जाते, अशा पद्धतीने पोलिसांची व्यापाऱ्यांप्रती वागणूक असल्याचे बोलले जात आहे. आधीच या कोरोनामुळे कर्जबाजारी झालेल्या व्यापार्यांना अधिक त्रास न देता, १०० टक्के अस्थापना सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. अजून आर्थिक नुकसान व्यापारी सहन करू शकत नाही. कोरोना रुग्णाचे बिल भरण्यासाठी घरातील दागिने विकायची वेळ काही जणांवर आली असल्याने आता सर्व व्यापारी वर्गाला व्यवसाय करू द्यावा अशा मागणीने जोर धरला आहे.