मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी भागात गुरुवारपासून चार दिवस विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी तापमान ३३ ते ३७ अंश असून येत्या चार दिवसात यामध्ये अजून काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी कमाल तापमान २८ अंश सेल्सियपर्यंत होते. तरी देखील रात्री कमालीचा उकाडा होता. मात्र, येत्या चार दिवसात तापमान मळबी सारखे झाल्याने, उकाड्यात कपात होऊन अति उष्ण तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अरबी सागरातील चक्रीय स्थिती किनारपट्टीलगत असलेल्या गावात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
खेड येथे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारे वाहू लागल्याने अनेकांची धावपळ उडाली. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग इतका होता कि निसर्ग आणि तोक्ते वादळाची पुन्हा आठवण झाली. दुपारपासूनच काळोख करत आलेलं आभाळ, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यात पावसाचे आणि वाऱ्याचे तांडव सुरु झाले.
संगमेश्वर तालुक्याच्या साखरपा येथील टोकापासून ते अगदी संगमेश्वरच्या पट्ट्यात जोरदार वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडला. देवरूखमध्ये तर गारांचा पाऊस पडला. देवरूख मातृमंदिर येथे रस्त्यावर झाड पडल्याने ओझरे गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली. वादळी स्थिती लक्षात घेऊन महावितरणने तालुक्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वादळी वार्यासह झालेल्या पावसाने आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकायला आलेले आंबे ऐन मोसमात गळून पडले.