जिल्ह्यात प्रशासकीय इमारतींवर सौरपॅनल बसवण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आणली आहे. सेव्ह एनर्जी, सेव्ह इंडिया योजनेंतर्गत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने घराच्या छपरावर सौर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मितीतून शून्य टक्के वीजबिल ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी वीजग्राहकांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. जिल्ह्यात प्रशासकीय इमारतींवर सौर पॅनल बसवण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आणली आहे.
शासनाच्या योजनेप्रमाणे, घरगुती वीज ग्राहकांसाठी एक ते तीन किलो वॅटपर्यंत ४० टक्के अनुदानित आणि तीन किलोपेक्षा अधिक ते १० किलो वॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यातून सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत २० टक्के तर प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट मर्यादेत गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघ अशांना घरगुती वापरासाठी २० टक्के अनुदान या योजनेतून दिले जाणार आहे.
आताच्या जगात सुद्धा विजेच्या संकटामुळे अनेक गावांमध्ये काळोखाचे साम्राज्य आहे. शेतीसाठी वीज मिळत नसल्याने अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून केंद्राने ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून रूप टॉप सौरऊर्जा योजनेंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॅट विजेचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. आता या योजनेतून घरगुती वर्गातील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेच्या क्षेत्रावरील रूफ टॉप सौरऊर्जा निर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी केंद्राकडून वित्तीय अनुदान थेट खात्यात जमा केले जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी ग्राहकांना महावितरण कंपनीच्या एमएनआरईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
घरगुती सोलर यंत्रणा बसवण्यासाठी केंद्राने मान्यताप्राप्त कंपनींना परवाना दिला आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून आपल्या घराच्या वीज वापराची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर हे सोलर युनिट घरावर बसवले जाईल. या युनिटची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सोलर ऊर्जेचा वापर पुरवठ्याप्रमाणे करता येणार आहे. या सोलरमध्ये निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा ही महावितरणकडे शिल्लक राहणार आहे. ज्या ग्राहकांची बिले पाचशे ते हजार रुपये वीजबिल येणाऱ्या ग्राहकांना ही योजना फायदेशीर ठरू शकणार आहे.