मोठ्या मोठ्या देशांपासून ते अगदी लहान शहरांपर्यंत कोरोना व्हायरस चांगलाच फोफावलेला दिसत आहे. मागील एक वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झालेला आणि अजूनही वेगाने पसरताना दिसत आहे. या कोरोनाच्या वेगाने वाढणार्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठया प्रमाणात ताण आलेला दिसत आहे. कोरोनाची गेल्या वर्षी सुरुवात झाली तेंव्हा, शासकीय तसेच खाजगी रुग्णालयामध्ये सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना प्रचंड प्रमाणात शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याचा परिणाम डॉक्टरांच्या तब्येतीवर झालेला दिसून आला आहे.
रत्नागिरीमधील कार्यरत डॉक्टरांची कहाणी काही वेगळी नाही आहे. शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांची संख्या कोरोनाची रुग्णसंख्या बघता पुरेशी नाही आहे. आणि पूर्वी फक्त कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी फक्त शासकीय रुग्णालयांनाचं देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासोबत रत्नागिरी मध्ये आत्ता अद्ययावत महिला रुग्णालयामध्ये सध्या कोविड सेंटर सुरु आहे. दिवसभर पीपीई कीट घालून रुग्णांची सेवा करताना काही वेळा डॉक्टरांना निवांत बसून जेवायला सुद्धा फुरसत मिळत नाही. अनियमित वेळेमध्ये जेवण, कायम कामामध्ये गर्क, कामाचा वाढलेला ताण, मानसिक थकवा त्यामुळे डॉक्टरांची तब्ब्येत ढासळत चालल्याचे दिसून येत आहे.
एरवी वजन कमी करताना तारेवरची कसरत करताना अनेकजण आपल्याला दिसतात. तरी पण काटा जरासा हलला तर हलला अशी अवस्था असते. पण या कोरोना काळामध्ये रत्नागिरीमधील अनेक कार्यरत डॉक्टरांची वजनामध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतीतले काही डॉक्टरांनी आपले अनुभव सुद्धा कथन केले आहेत. सगळ्यांच्या अनुभवामध्ये असलेले मुद्दे म्हणजे, अनियमित जेवण, झोप, अपुरी विश्रांती, मानसिक तणाव हेच आहेत. परंतु तरीही जेवढ शक्य होईल तेवढ ते स्वताची काळजी घेत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.