जिल्हयात गेले दोन ते तीन दिवस हवामानामध्ये मोठे बदल झाले आहेत. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज दिवसभर पश्चिम प्रक्षोभामुळे ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजाप्रमाणे सकाळपासून जिल्ह्याभरात बहुतांश ठिकाणी पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये संगमेश्वर रत्नागिरी शहर परिसरामध्ये विजांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. चिपळूण खेड दापोली येथेही ढगाळ वातावरण असून चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी पावसामुळे अंधार पसरला आहे.
मागील दोन-तीन वर्षापासून निसर्ग चक्रामध्ये सात घडत असलेल्या अनपेक्षित बदलामुळे कोकणवासी मात्र चिंतेत पडले आहेत. या हवामानाच्या अलीकडे कोपलेल्या स्थितीमुळे उरला सुरला जो काही आंबा, काजू हाता तोंडाशी आला होता त्याची मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने दैना उडाली, त्यामुळे बागायतदार हतबल झाला आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश येथे वाऱ्याचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे कोकणात रत्नागिरी जिल्हयातही त्याचा प्रभाव जाणवत आहे.
प्रत्येक दिवसाच्या बदलत गेलेल्या वातावरणामुळे जिल्हयामध्ये तापमानाचे तीन तेरा वाजले आहेत. एवढा उष्मा वातावरणामध्ये वाढला आहे कि, मिनी महाबळेश्वर असलेल्या दापोलीमध्ये पारा चक्क ४० अंशावर गेला आहे. सकाळी तापमानात काही अंशी घट जाणवत आहे. पण बंगालच्या खाडीतुन उत्तरेकडे जाणारे वाऱ्यांमुळे हा प्रभाव आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण व पाऊस राहील असा अंदाज आहे. पण हवामानात अनपेक्षित बदल होत आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणता बदल घडून येतो त्यावरच शुक्रवारची काय स्थिती राहील याचा अंदाज वर्तवण्यात येईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.