रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील आवाशी फाट्याजवळील एका सुप्रसिद्ध कंपनीच्य मोकळ्या मैदानात असणार्या लहान पऱ्याजवळ अज्ञात कंपनीने रसायनमिश्रित पाणी सोडले. पावसाळ्यामध्ये मैदानात मुबलक गवत उपलब्ध होत असल्याने ९ म्हशी तिथे चरायला आल्या होत्या. त्या म्हशीनी ते रसायन मिश्रित पाणी प्यायले असता, त्यातील तीन दुभत्या म्हशींचा त्यामध्ये मृत्यू ओढावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गावातील आखाडे कुटुंबियांच्या मालकीच्या असणाऱ्या ९ दुभत्या म्हशी मैदानावर चरण्यासाठी सोडलेल्या होत्या. मोकळ्या मैदानाशेजारी असलेल्या छोट्या पर्यामध्ये कोणत्या तरी कंपनीने रसायनमिश्रित पाणी सोडले होते. ते पाणी या म्हशींनी प्यायल्याने त्या त्वरित अत्यावस्थ झाल्या.
खेड पंचायत समितीचे उपसभापती जीवन आंब्रे यांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्वरित पशुवैद्यकीय पथकाला माहिती दिली. ते पथकही त्वरित हजर झाले. तेथेच अत्यवस्थ झालेल्या म्हशींवर उपचार सुरू करण्यात आले परंतु, त्यातील ३ दुभत्या म्हशींचा अंत झाला. तसेच ६ म्हशींवर सुद्धा उपचार सुरु आहेत, पण त्यांचाही जीव वाचण्याची शक्यता अंधुक असल्याचे पशुवैद्यकीय पथकाने सांगितले. आखाडे कुटुंबियांचे उदरनिर्वाह याच म्हशींवर चालत होते. परंतु आता ३ दुभत्या म्हशींच्या झालेल्या मृत्यूने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उत्पन्नाचे साधनच शिल्लक न राहिल्याने आता चरितार्थ भागवायचा कसा प्रश्न कुटुंबीयांसमोर पडला आहे.
माजी उपसभापती सचिन आंब्रे यांनी यासंदर्भात पाणी आणि वायू प्रदुषणासंदर्भात एमआयडीसीतील काही कंपन्यांवर ताशेरे ओढले आहेत. पाऊस आणि सकाळच्या धुक्याचा फायदा घेऊन काही कंपन्या असे रसायनमिश्रित पाणी उघड्यावर अथवा नाल्यांमध्ये सोडतात. ज्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. अशाप्रकारे नाल्या नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडल्याने, पाळीव जनावरांच्या जिवावर बेतते,अशा संबंधित कारखान्याची चौकशी करून त्यांवर त्वरित कारवाई करावी आणि आखाडे कुटुंबियांचे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली आहे.