रत्नागिरी जिल्ह्याला स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे खास या समुद्र किनारा, मत्स्य खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायला अनेक देशविदेशांतून पर्यटक येतात. त्यामुळे गावातील नागरिकांना सुद्धा काही न काही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. काही जण मासेमारी व्यवसाय करून मिळालेल्या मालाची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
आज गुहागर तालुक्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावरील वरचा पाट परिसरामध्ये समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसून आला आहे. तसेच तो तवंग ठराविक भागामध्येच असून किनाऱ्यावरील वाळूला तो चिकटत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. नक्की तो तवंग कसा निर्माण झाला ! कुठून वाहत आला याबाबत ग्रामस्थांची संभ्रमित अवस्था झाली आहे. लाटांबरोबर वाहत येणाऱ्या या तवंगाचे प्रमाण वाढले तर, समुद्रातील माशांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच आता फक्त ठराविक भागामध्ये असणारा तेलाचा तवंग संपूर्ण समुद्रात पसरू शकतो. आणि त्याचा परिणाम छोट्या प्रमाणात किनाऱ्यावरून करणाऱ्या मच्छीमारी व्यवसायावर होऊ शकतो.
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे, वाऱ्याच्या वेगामुळे समुद्र खवळलेलाच असतो. त्यामुळे तेलाचा तवंग संपूर्ण किनाऱ्यावर पसरून सर्व किनारपट्टी दुषित होण्याची शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे किनाऱ्यावर चालणे देखील कठीण होऊ शकते. पायाला वाळूमिश्रित तेलाचा तवंग चिकटल्याने त्वचेचे सुद्धा काही आजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यामध्ये समुद्र कायम खवळलेलाच असल्याने, किनार्यागत येणाऱ्या लाटांमध्ये लहान मोठे मासे पकडण्यासाठी गावातील काही मंडळी जातात. किनारपट्टीवर हाताने जाळी टाकून मच्छी पकडणाऱ्याच्या जाळ्याला सुद्धा त्यामुळे नुकसान होऊ शकते.