रत्नागिरी तालुक्यात असलेल्या एमआयडीसी विभागामध्ये अनेक उद्योगधंदे बंद स्वरुपात आहेत. काही जेमतेम स्थितीत सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व उद्योजक संघटनांची समस्या निवारणासाठी नव्याने शिखर संघटना स्थापन झाली आहे. त्याचे सचिव केशव भट यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या एमआयडीसी तसेच बिगर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योगांना येणाऱ्या समस्यांबाबत संबंधित सर्व विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.
हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक बैठक लावून त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली. त्यानुसार, आज १४ तारखेला या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना रत्नागिरी येथे बोलावून घेऊन जिल्ह्यातील सर्व उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर त्यांची चर्चा घडवून समस्येवर तोडगा काढता येईल, असे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. तशी बैठक आयोजित करण्याच्या सूचना सर्व संबंधित उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दिल्या.
एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात बहुतांशी कारखाने बंद आहेत व काही तर भग्नावस्थेत आहेत. एमआयडीसीची औद्योगिकदृष्ट्या अतिशय वाईट स्थिती आहे, ही बाब लघु उद्योजक संघटनेने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिली. कारखान्यांनी बीसीसी घेतली असल्यामुळे त्यांच्यावर महामंडळ कारवाई करू शकत. परिणामी, नवीन उद्योजकांसाठी ते उपलब्ध होत नाहीत, अशी किचकट परिस्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील ८० टक्के भूखंड वाटप होऊनही कारखाने सुरू नाहीत. मंत्री सामंत यांनी याची दखल घेतली. तातडीने नियमात योग्य तो फेरबदल करून हे भूखंड परत घेऊन नव्याने त्यांचे वाटप करण्याबाबत महामंडळाच्या सीईओंशी दूरध्वनीवरून चर्चा करून तशा सूचना केल्या.
जिल्ह्याला एमएसएमईच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असे आश्वासन सामंत यांनी यांनी यावेळी दिले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनेक शासकीय योजना आत्मनिर्भर भारत आणि एमएसएमइच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर परिणामकारकरित्या पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा उद्योग केंद्राला येणाऱ्या अडचणीही या वेळी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रत्येक तालुक्याला एक स्वतंत्र व्यवस्थापक नसल्यामुळे तसेच मागील दहा वर्षे या विभागाला वाहन नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली.