रत्नागिरी मध्ये आज पासून जिल्हा प्रशासनाने कडक संचारबंदी केली आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता अधिक वाढल्याने दिनांक ३ जून ते ९ जून पर्यंत कडक संचारबंदी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी करण्याआधी जनतेला विश्वासात घेण्यासाठी जनजागृती करा आणि मग अॅक्शन घ्या, अशी सूचना दिली होती. त्यानुसार रत्नागिरीमध्ये पोलिसांनी संचलन करून जनतेला संचारबंदीमध्ये घातलेल्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिलेल्या माहितीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दलाने एकूण ४२ गावे दत्तक घेतली आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पथके तयार करणे गरजेचे आहे. अपुरी वैद्यकीय अधिकारी,नर्सेस,स्टाफ यांच्यामध्ये वाढ झाली तर कोरोना चाचण्या वेगवान गतीने होतील त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होईल. कालची कोरोना संक्रमितांची संख्या पहिली असता, ६५५ कोरोना नवीन रुग्णांची नोंद केली गेली आहे. एवढ कडक लॉकडाऊन असून सुद्धा संक्रमितांच्या संख्या घटण्याची काहीच लक्षणे दिसत नसल्याने शासन विविध उपाययोजना राबवत आहे.
शासन आपल्या परिने पूर्ण प्रयत्न करत असून, जनतेने मागील वर्षापासून केलेले सहकार्य सुद्धा नक्कीच मानण्याजोगे आहे. जिल्हा रेड झोन मधून बाहेर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये ५७ ठिकाणी नाकाबंदी केलेली असून, विनाकारण फिरणार्यांवर (कोरोना स्प्रेडर) पोलीस कडक कारवाई करणार आहेत. पोलीस यंत्रणेसह आरोग्य विभाग सुद्धा सोबतीने अॅक्शन मोड वर असणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी दिली.