रत्नागिरी पोलिसांनी तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या – पुण्यातील टोळी

52
Ratnagiri police arrested the three thieves

शहरातील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारणाऱ्या पुण्यातील पाच जणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यांना २१ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रत्नागिरी शहरातील नाचणे सोहम वैभव अपार्टमेंटमधील केदार सहस्रबुद्धे यांचा बंद फ्लॅट ११ एप्रिल २०२३ ला भरदुपारी चोरट्यांनी फोडला होता. त्यानंतर सहस्रबुद्धे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा. तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला होता. सुरवातीला उस्मानाबाद येथील राम लक्ष्मण क्षीरसागर (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला;मात्र तो त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची नावे सुरवातीला सांगत नव्हता. पोलिस कोठडीची मुदत संपत असताना त्याने आपल्या सहकाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली; मात्र तोपर्यंत त्याचे सहकारी गायब झाले होते. पोलिस उपनिरिक्षक आकाश साळुंखे संशयित आरोपींच्या मागावर होते.

या वेळी मुळचे पुण्यातील असलेले संशयित सातारा, सांगली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने सूर्यकांत ऊर्फ चिन्या अनंत माने (२७), चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (२९) या दोन सख्ख्या भावांसह राहुल हिरामन लष्करे (२२, सर्व रा. चिंचवड, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून १२.७० ग्रॅमचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पुणे -चिंचवड येथील पाचजणांची टोळी जिल्ह्यात सक्रिय होती. त्यातील एकाला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे तर मुळ सुत्रधार असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचाच – एक सहकारी अजूनही पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.