आपापसातील वाद मिटवण्याचे आवाहन मच्छीमारांचा एकत्रित विकास साधणार – मंत्री रुपाला

57
Union Minister Rupala will achieve collective development of fishermen

मिरकरवाडा बंदरातील टप्पा २ साठी निधी, बंद नौकांचे परवाना नूतनीकरण, सुधारित कायद्यामधील जाचक अटी, इंधनावरील व्हॅट रद्द करणे या समस्या सोडवण्याची मागणी मच्छीमारांनी केली. या समस्यांबाबत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मच्छीमारांनी एकत्र येवून मच्छीमार विकास साधू, असे आश्वासन दिले. तसेच पारंपरिक आणि अपारंपरिक मच्छीमारांनी आपापसात लढाई करू नये आणि अपारंपरिक नौकांनी आधुनिक व्हावे, अशी सूचना केली. मच्छीमारांच्या कल्याणासाठी मंत्री रुपाला यांनी सागर परिक्रमा सुरू केली आहे. गुजरातपासून वेस्ट बंगालपर्यंतच्या प्रत्येक जिल्ह्यातील बंदरांना भेटी देत आहेत. या भेटीत ते मच्छीमारांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत आहेत. गुरुवारी (ता. १८) ते मिरकरवाडा जेटीवर समुद्रमार्गे आले. पर्ससीननेट मच्छीमार तालुका मालक मच्छीमार असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा पर्ससीननेट मच्छीमार असोसिएशनतर्फे मच्छीमार नेते विकास ऊर्फ धाडस सावंत, नासीर वाघू, विजय खेडेकर, इम्रान मुकादम, जावेद होडेकर, नुरुद्दीन पटेल आदींनी त्यांचे स्वागत करून मच्छीमारांच्या अडचणींचे निवेदन दिले.या निवेदनात मिरकरवाडा जेटी १ ची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. मच्छीमार नेत्यांनी यावेळी मासेमारी उद्योगातील समस्या मांडून त्या सोडवण्याची विनंती केली. यामध्ये मिरकरवाडा टप्पा २ साठी निधी, बंद नौकांचे परवाना नुतनीकरण, सुधारीत कायद्यामधील जाचक अटी, इंधनावरील व्हॅट रद्द करणे या संदर्भातील समस्या मांडल्या. या समस्यांबाबत केंद्रीय मंत्री रुपाला यांनी पारंपरिक आणि अपारंपरिक मच्छीमारांनी आपापसात लढाई करु नये, असा सल्ला दिला. मत्स्यव्यवसायाचे महत्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाचे मत्स्यव्यवसाय मंत्रालय सुरु केले.

२०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मत्स्यसंपदा योजनेतून २० हजार करोड रुपये आणि पायाभूत सुविधांसाठी १३ हजार करोड रुपये निधी दिला आहे. असे त्यांनी सांगितले.पालकमंत्री उदय सामंत यांनी मच्छीमारांनी केलेल्या सर्व मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. पारंपरिक, अपारंपरिक मच्छीमारांनी आपापसातील वाद मिटवले पाहिजेत असे सांगून मिरकरवाडा टप्पा क्र. ३ चे भूमिपूजन पुढच्या वर्षी करुया, असे सांगितले. केंद्रीय मंत्री रुपाला यांनीही आता आपण स्वतः सर्व अडचणी पाहिल्या आहेत. त्यामुळे सुधारणांसाठी पैशांची कमतरता नाही. ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन दिले.व्यासपिठावर यावेळी मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. अतुल पाटणे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, केंद्रीय सचिव आदी उपस्थित होते.