रत्नागिरीतील प्रसिद्ध रांगोळीकार आणि कला शिक्षक राहुल कळंबटे यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून १८ तास कठोर मेहनत घेऊन राजमुद्रेची रांगोळी साकारली आहे. मालगुंड सारख्या ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या अंगात असलेली रांगोळीची कला जोपासत, सुरुवातीला फक्त संस्कार भारती ते रेखाटत असत. त्यानंतर मात्र रांगोळी मधील विविध प्रकार स्वमेहनतीने शिकून त्यामध्ये नाव कमावले. त्यांनी व्यक्ती चित्र, तैल चित्र, वाळूशिल्प, वेगवेगळी भित्तीपत्रके त्याचप्रमाणे चित्रकलेमध्ये सुद्धा त्यांचा उत्तम हातखंडा आहे.
सध्या ते कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस प्रशालेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांमध्ये त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी शिकून प्रगत झाले आहेत. ते सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अनेक ठिकाणी रांगोळी, पोर्ट्रेट अशा एक ना अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यांनी रांगोळीमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
रत्नागिरीमधील अनेक कार्यक्रमामध्ये राहुल कळंबटेंची रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. दरवर्षी नगरपरिषद आगाशे कन्या शाळेमध्ये रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, त्यामध्ये सुद्धा रांगोळीकर राहुल कळंबटे यांच्या विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारतात. सांगलीमध्ये शांतीनिकेतन लोकविद्यापीठाद्वारे आयोजित पहिल्या थ्रीडी रंगावली स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी १५ तासांची मेहनत घेऊन साकारलेल्या रांगोळीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच रत्नागिरीमध्ये कोरोना महामारीवर आधारित एक समयसूचकता दाखविणारी रांगोळी त्यांनी साकारलेली. कोरोना महामारीमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे एक प्रकारे मनोबल वाढविण्यासाठी देवी स्वतःचा मुकुट काढून डॉक्टरांच्या डोक्यावर मुकुट ठेवत आहे असा संदेश देणारी, डॉक्टरांना देवत्व बहाल करणारी रांगोळी साकारली होती. काल शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून काढलेल्या राजमुद्रेची काढलेली भव्य दिव्य रांगोळी पाहून, अनेक अधिकाऱ्यांनी फोन आणि मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्याचे राहुल कळंबटेनी सांगितले. रत्नागिरी आणि रांगोळीकार राहुल कळंबटे हे एक उत्तम समीकरणच बनले आहे. रत्नागिरीमधील सर्वांच्याच सोशल मिडिया स्टेटसला राहुल कळंबटेनी साकारलेली राजमुद्रा दिसत आहे.