26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriलोकसभा आम्ही अडीच लाखाने जिंकू : राऊत

लोकसभा आम्ही अडीच लाखाने जिंकू : राऊत

सत्तेच्या दबावाला न डगमगता आम्ही उभे आहोत.

आगामी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात किरण सामंत आमच्या विरोधात असले, तरी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अडीच लाखांच्या फरकाने निवडून येईल. ही काळ्या दगडावरील भगवी रेघ आहे. सत्तेचा दुरुपयोग करत नामोहरम करून शरण ये तरच अभय देतो, असा घाणेरडा प्रकार सुरू आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. सत्तेच्या दबावाला न डगमगता आम्ही उभे आहोत. खासदार आणि आमदारही आम्ही निवडून आणू, असा निर्धार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील विभागप्रमुखांशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली.

या वेळी विलास चाळके, बंड्या साळवी, शेखर घोसाळे आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो अडीच लाखांच्या फरकाने निवडून येईल. अडीच लाखांचे गणित आता सांगणार नाही; परंतु महाराष्ट्राच्या जनतेमध्ये बेईमानी, गद्दारांबद्दल चीड आहे. ती मतदानात दिसून येईल. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल का, या प्रश्नावर राऊत म्हणाले, ‘शिवसेना एवढी मजबूत आहे की आमच्यात सक्षम उमेदवार असल्याने दुसरीकडून आलेला उमेदवार देण्याची आम्हाला गरज नाही.

उद्धव ठाकरे शिवसेनेतही प्रवेश सुरू आहेत. मुंबईत लवकरच प्रवेश होणार आहे; परंतु दुसऱ्या पक्षातील लोकांना घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. इतर पक्षातील घेत असताना गद्दारी आणि बेईमानी करणाऱ्यांना शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत.’

सत्तेच्या स्वार्थासाठी सामंत पक्ष बदलतात – आदित्य ठाकरेंना पक्षासाठी अंगणात येऊन बैठका घेण्याची वेळ आली, अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. याला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, ‘उदय सामंत तुम्ही काय करताय. वाड्या, वस्त्या, मोहल्ल्यांमध्ये जाऊन बसावे लागले. आमच्याकडे या म्हणून भीक मागावी लागते, मग ही नाटकं कशाला पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन मिळून मिसळून राहणारा नेता म्हणून आदित्यजींचा गवगवा आहे. सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या सामंतांनी स्वार्थापोटी पक्ष बदलला हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.’

RELATED ARTICLES

Most Popular